आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनीचा जोरदार सराव   

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या दमदार फटकेबाजीने कायम चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी धोनीची ओळख टीम इंडियाचा सर्वोत्तम मॅच फिनिशर अशी होती. धोनी कोविड काळात निवृत्त झाला, पण आयपीएलमध्ये तो अजूनही आपली फटकेबाजी दाखवून देत आहे. १० महिने क्रिकेटपासून दूर राहणे आणि नंतर अचानक २ महिने सलग क्रिकेट खेळणे ही गोष्ट कठीण आहे. पण धोनी ही गोष्ट गेली ३-४ वर्ष करतो आहे.
 
यंदाच्या आयपीएलला देखील अवघे ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच संघ दमदार तयारी करत आहेत. चेन्नई च्या संघाने देखील आपसात एक सामना खेळला. त्यावेळी धोनीने आपल्या लोकप्रिय हेलिकॉप्टर शॉटची झलक दाखवली.चेन्नई संघाकडून धोनीचा हा शेवटचा हंगाम आहे अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. गेल्या २-३ वर्षांपासून धोनीबाबत या चर्चा ऐकू येत आहेत. पण धोनी मात्र दरवर्षी त्याच जोशाने आणि नव्या दमाने मैदानात उतरतो आणि सार्‍यांना थक्क करतो. 
 
यंदाही धोनीने सराव सामन्यात दमदार फटकेबाजी केली. श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना गोलंदाजी करत होता. लसिथ मलिंगा सारखी शैली असलेल्या पाथिरानाने गोलंदाजी करताना यॉर्कर चेंडू टाकला. धोनीला त्या यॉर्करचा काहीच फरक पडला नाही. धोनी हेलिकॉप्टर शॉट लगावत आलेला चेंडू त्याच वेगाने टोलवला आणि सीमारेषेपार पाठवला. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी यावर्षी जेव्हा चेन्नईच्या ताफ्यात सामील होण्यासाठी आला, तेव्हा त्याने एक खास टी-शर्ट घातला होता. त्याच्या टी-शर्टवर सांकेतिक भाषेत लिहिले होते की शेवटची संधी. हा टी-शर्ट चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावरदेखील या टीशर्टवरून युजर्सनी विविध अर्थ लावण्यास सुरुवात केली. धोनी यंदा आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळतो असे बहुतांश युजर्सने दावा केला. पण चेन्नई किंवा धोनीकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Related Articles